उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात बोलताना ‘पीएच.डी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयासंदर्भात बोलताना एक धक्कादायक विधान केलं होतं. “पीएच.डी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत ?”, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनं देखील केली. अजित पवारांच्या या विधानावर राजकीय नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. यानंतर अखेर अजित पवारांनी यावर भाष्य करत पीएच.डीवरील आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला, आपण याबाबत दिलगिरी व्यक्त केली असल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
‘काहींनी राजकीय नेत्यांवर पीएच.डी केली..’
“पीएच.डीबद्दल मी भूमिका मांडत होतो, पण माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. माझ्या विधानाचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली. याबाबत मी कालच प्रेस नोट काढली. नेत्यांवरही काहीजणांची पीएच.डी सुरु आहे. कोणत्या नेत्यांवर पीएच.डी सुरु आहे, त्यांचे नावे मी घेत नाही. पण मला वाटतं पीएच.डी हे महत्त्वाचं शिक्षण आहे. त्यात खूप अभ्यास करावा लागतो. त्याबाबत विषय तशा प्रकारचा असायला हवा”, असे अजित पवार म्हणाले.
जुन्या पेन्शनबाबत पवारांनी दिले संकेत
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सध्या कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. या संदर्भात बोलताना अजित पवारांनी महत्वाचे संकेत दिले. ते म्हणाले, जुन्या पेन्शनबद्दल कर्मचारी संघटनांशी बैठक घेतली. सरकार जुन्या पेन्शनबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेईल. पेन्शनचा निर्णय येणाऱ्या अर्थसंकल्पात मांडण्यात येईल, त्यामुळे आता संघटनांनी आपला संप मागे घ्यावा”, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.