• Wed. Jun 18th, 2025

एसटीच्या खासगी हॉटेल थांब्यावर 30 रुपयात नाश्ता मिळतोय का? अधिवेशनात आला प्रश्न, काय निघाले आदेश ?

Byjantaadmin

Dec 14, 2023

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी खाजगी हॉटेल्सना अधिकृत थांबे दिले आहेत. या अधिकृत थांब्यांवर हॉटेल चालकाने एसटीच्या प्रवाशांना 30 रुपयांत चहा-नाश्ता आणि छापिल किंमतीवर एसटीचे अधिकृत नाथजल पिण्याचे बाटली बंद पाणी देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सुविधा दिली जात नसल्याची तक्रार नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत आहे. याची दखल घेत एसटी महामंडळाने आता या योजनेची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे नेमका निर्णय चला पाहुयात…

एसटी महामंडळाने तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटीच्या खाजगी हॉटेल्सवरील थांब्यामध्ये 30 रुपयांत चहा-नाश्ता देण्याची घोषणा केली होती. या योजनेमुळे प्रवाशांना अत्यंत स्वस्त दरात चहा आणि नाश्ता मिळण्याची सोय झाली होती. परंतू काही हॉटेल चालकांनी या योजनेचे पोस्टर्स योग्य जागी लावले नव्हते. तसेच काही हॉटेलचालकाकडून या योजनेला हरताळ फासला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या हॉटेलचालकांना एसटीचे अधिकृत नाथजल हे बाटलीबंद पाणी देखील छापिल किंमतीपेक्षा जादा दरात विकले जात असल्याचे उघडकीस आले होते. या संदर्भात नागपूरातील हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधीकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी अशा हॉटेल चालकांनी झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत.

काय दिले आदेश ?

एसटीच्या अधिकृत थांब्यांवर एसटी प्रवाशांना 30 रुपयांत चहा-नाश्ता आणि नाथजल पिण्याचे बाटलीबंद पाणी उपलब्ध केले जाते का ? याबाबत आता एसटी महामंडळाने विभागीय स्तरावर महिन्यातून किमान दोन वेळा या अधिकृत थांब्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकृत हॉटेल चालकांकडून एसटीच्या नियमांची पायमल्ली होत असताना दिसल्यास वा अशा स्वरुपाची प्रवाशांची तक्राक प्राप्त झाल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रभावाने कारवाई करण्यात यावी. तसेच केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल दर महिन्याच्या अखेर या कार्यालयास सादर करावा असे आदेश एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. तसेच एसटी चालक जर अनधिकृत हॉटेलावर थांबा घेत असतील तर अशा चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *