नवी दिल्ली;-अरुण गोयल यांना निवडणूक आयुक्तपदी नियुक्त करण्याच्या पद्धतीवर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले आहेत. बुधवारी न्या. के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेतील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) व निवडणूक आयुक्त (ईसी) निवड प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेशी संबंधित याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. पीठ म्हणाले, निवडणूक आयुक्त स्वतंत्र, मजबूत व निष्पक्ष असावेत. त्यासाठी त्यांची निवड कॅबिनेटऐवजी मोठ्या मंडळाने करावी. याबाबत नेते बोलतात, पण ग्राउंड लेव्हलला अजून काहीच झालेले नाही. कोर्ट म्हणाले, पीठ सुनावणी घेत होते तेव्हा गोयल यांची नियुक्ती केली नसती तर बरे झाले असते. वस्तुत: गोयल यांची नियुक्ती १९ नोव्हेंबरला करण्यात आली. आता यावर गुरुवारी सुनावणी होईल.
चारित्र्यवान व्यक्तीची गरज : कोर्ट कोर्ट म्हणाले, नियुक्तीत काही चलाखी झाली का, हे आम्हाला पाहायचे आहे. यावर अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी म्हणाले, नियुक्तीच्या मोठ्या मुद्द्यावर कोर्ट सुनावणी घेत आहे. अशा वेळी प्रशांत भूषण यांच्या वैयक्तिक प्रकरणाकडे बघितले जाऊ नये. त्याआधी कोर्टाने म्हटले होते, दबावाखाली न येणाऱ्या चारित्र्यवान व्यक्तीची या पदावर गरज आहे.