ओळख स्व – सामर्थ्याची हिरकणी महिला संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर – धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २३०० हुन अधिक महिलांनी नोंदवला सहभाग
लातूर : हिंदू संस्कृतीतच स्त्री सामर्थ्याचे दर्शन पूर्वापार घडत आले आहे. त्याचा अध्ययन , स्मरण करून महिलांनी आपल्या स्व – सामर्थ्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि जगाला ती ओळख करून दिली पाहिजे, असा सूर लोकसेवा मंडळाच्या वतीने लातुरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ओळख स्व – सामर्थ्याची हिरकणी महिला संमेलनात उमटला. या संमेलनास अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाचे उदघाटन लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ. वर्ष घुगे – ठाकूर, सेवाभारतीच्या सौ.पद्माताई कुबेर यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनास लातूर – धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २३०० हुन अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला. या संमेलनाच्या माध्यमातून भारतीय स्त्री शक्तीचे आगळे वेगळे रूप पाहायला मिळाले.
कुटुंबाच्या प्रगतीत तसेच राष्ट्राच्या उभारणीत महिलांचा वाटा मोठा असतो. समाजाच्या विविध स्तरातील महिलांचे एकत्रीकरण, सबलीकरण व्हावे या हेतूने सदर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनास जिल्हाधिकारी सौ. वर्ष घुगे – ठाकूर यांसह संमेलन प्रमुख सौ.विजया हुरदळे, सह प्रमुख सौ.उज्वला मसलेकर, सौ. जयश्री सुगरे, सौ. विद्या नाथबुवा, सौ . स्वाती अनारगट्टे, डॉ. सुनिता कामदार, सौ. सीमा अयाचित,सौ. रजनी महाजन, सौ. अनघा अंधोरीकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले विचार व्यक्त करताना जिल्हाधिकारी वर्ष घुगे – ठाकूर यांनी ‘ मी कशी घडले ‘ याविषयी उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, ” महिलांनी कुटुंब, तसेच कार्यक्षेत्राचा उत्तम समतोल राखत आपले व्यक्तिमत्व खुलवले पाहिजे . आपण घडत असताना शिस्त ,कार्यनिष्ठा, नेतृत्वगुण, जिज्ञासा, अशा अनेक गुणांचा समुच्चय कामी आल्याचे सांगितले. पहिला नंबर टिकवणे हे पहिला नंबर मिळविण्यापेक्षा अधिक अवघड असते. प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व दाखवून देण्याबाबत त्यांनी तरुणींना स्वप्नपूर्तीची प्रेरणा दिली. अतिशय दिलखुलास पद्धतीने त्यांनी महिलांशी संवाद साधला व तरुणींना प्रश्न विचारण्याची संधी दिली. तसेच विचारलेल्या प्रश्नांना मोकळेपणे उत्तरे देत ” आपले पेहराव जसे ब्रँडेड वापरतो तसेच आपले विचारही ब्रँडेड ठेवा” हा मोलाचा सल्ला दिला . सर्व महिलांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे , असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना सेवाभारतीच्या पद्माताई कुबेर म्हणाल्या “आज आपण स्व ओळख करून घेण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहात ही कौतुकाची गोष्ट आहे. शिक्षणाला जीवनात प्राधान्य देऊन त्यासाठी कौटुंबिक सामाजिक पातळीवर लढा देणाऱ्या देशातील पहिल्या सेवाव्रती डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा आदर्श आजही महिलांनी डोळ्यासमोर ठेवावा असा आहे. सन १८८६ च्या काळात त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी ज्या पध्दतीने कुटुंबियांशी, समाजही लढा दिला ही बाब महिलांसाठी कायम प्रेरणादायी आहे. कोण काय म्हणेल ? याचा विचार न करता, सुपर वुमन होण्याच्या फंदात न पडता स्वतःसाठी वेळ द्या, छंद जोपासा ,व्यवहार चतुर बना, स्वतःसह प्रत्येक महिलांचा सन्मान करा आणि आपले कर्तृत्व समाज व देशाप्रति समर्पित करा असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा चंद्रपाल दंडीमे यांनी महिला सुरक्षा, डॉक्टर अमृता पाटील यांनी महिला आरोग्य, ॲड. श्रीमती स्मिता परचुरे यांनी निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, वैद्य आरती श्रीनिवास संदीकर यांनी अध्यात्मातील विज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.
शेवटच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्रीमती जगदेवी लातूरे ह्या होत्या. या सत्रात प्रमुख वक्त्या श्रीमती मैत्रेयी शिरोळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संमेलन प्रमुख सौ.विजया हुरदळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरूवात ‘गाऊ जिजाऊस आम्ही’ या स्नेहल आर्वीकर व त्यांच्या टीमने सादर केलेल्या पोवाड्याने झाली. कु. उत्कर्षा हुरदळे, सौ. प्रियंका कांबळे व सौ.पूजा कांबळे यांनी वैयक्तिक तसेच सांघिक गीत गायले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. शैलजा हासबे, सौ,अंजली आपशेटे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.जयश्री सुगरे यांनी केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.