नागपूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमचं एकच मत आहे. की पत्रावर आम्ही सह्या करत असताना काय लिहिलं होतं? अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते व्हावेत, यासाठी आमच्या सह्या घेतल्या गेल्या होत्या. मात्र आता निवडणूक आयोगासमोर तोच पेपर वापरला की काय अशी शंका आम्हाला आली. तो जर पेपर त्यांनी वापरला असेल तर साध्या भाषेत याला चोरीच म्हणावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. नागपुरात टीव्ही 9 मराठीशी बोलताना रोहित पवार यांनी हे विधान केलं आहे.
राजकारण करणारे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. याचं घेणं देणं मला नाही. सामान्य लोकांना माझ्या बद्दल काय वाटतं आणि मला त्यांच्याबद्दल काय वाटतं, हे महत्वाचं आहे. सामान्य लोकांच्या अडचणी समजून घेतो. त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. मी खऱ्या अर्थाने समाजकारण करतोय. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 22 दिवसात लोकांमध्ये गेल्यानंतर मला एका गोष्टीची जाणी झाली आहे की, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांमध्ये क्षमता आहे. पण त्यांना तशी संधी दिली जात नाही, असं रोहित पवार म्हणाले.