जालना : मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती. या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी १७० एकर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन व कपाशीसह लावलेली पिके उपटून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते. हातातोंडाशी आलेलं पीक उपटून फेकताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाच विचार केला नव्हता. त्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.मनोज जरांगे यांच्या सभेमुळे ४४१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३२ लाख रुपये मदत म्हणून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानिमित्ताने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला आहे. उपोषण मागे घेताना जरांगे यांनी राज्य सरकारपुढे काही अटी ठेवल्या होत्या. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, या प्रमुख अटीसह सभेसाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची अटही जरांगे यांनी घातली होती. ती अट शासनाने मान्य करत ४४१ शेतकऱ्यांना ३२ लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या १४ ऑक्टोबर रोजीच्या सभेला लाखोंच्या संख्येने आलेल्या जनतेने सोयाबीन, कपाशीचे उभे पीक तुडवून सभेची जागा गाठली. सभा निर्विघ्नपणे पार तर पडली पण गरीब शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने ३२ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका शासनाने घेतलीच आहे. शिवाय दुसरीकडे संबंधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घनसावंगी तालुक्याच्या गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर देखील पुढे सरसावले. आपल्या शेतातील पिके मोडून जागा दिली, अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दहा क्विंटल गहू बियाणे व २१ बॅग सरकी पेंड देण्यात येणार आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून तौर यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी कंबर कसलेल्या मराठा बांधवांची ही भावना वाखाणण्याजोगी असून परिसरात त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.