मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या बंगल्याच्या व गाड्यांच्या जाळपोळीसाठी गृहखात्यास जबाबदार धरले आहे. या घटनेस गृहखाते जबाबदार असून ते त्यांचे अपयश आहे, असेही ते म्हणाले. मराठवाड्यात बीड, माजलगाव येथे ही घटना घडली होती. ही घटना घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा गंभीर आरोपही सोळंके यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यादिवशी काय घडले याची माहिती सोळंके यांनी दिली. त्या संतप्त जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त अन्य जमातीचे लोक होते. काळाबाजाराच्या धंद्यातील लोक होते. माझे ३० वर्षांपासूनचे राजकीय विरोधक, त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षकही होते, असा दावा त्यांनी केला. जमावातील सुमारे तीनशेजण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र, मोठे दगड, पेट्रोल बाँब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आल्याचा गंभीर आरोपही सोळंके यांनी केला. पोलिसांना मी सीसीटीव्ही फूटेज दिले आहे. केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई नको, अशी माझी मागणी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. २०११पासून जरांगे आरक्षण विषयावर काम करीत आहेत. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. अतिशय प्रामाणिक, अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून ते पुढे येत आहेत. मी या आंदोलनात दोन महिन्यांपासून सहभागी आहे. माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो. आमदार होण्यापूर्वी पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य होतो. माझे वडील जिल्हा परिषद अध्यक्ष व प्रदीर्घ काळ राज्यमंत्री, मंत्रीसुद्धा होते, असे त्यांनी सांगितले.
‘पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्याची गरज’
या प्रकरणी आत्तापर्यंत २१ जणांना अटक झाली असून, आठ आरोपी मराठा आंदोलकांव्यतिरिक्त आहेत. माझ्या कार्यालय, घराचे पूर्ण नुकसान झाले. मी अजूनही तक्रार केलेली नाही. घटना घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. जालन्यातील घटनेनंतर पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.