• Sat. Jun 21st, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन :लातूर जिल्ह्यात 15 ठिकाणी होणार दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

Byjantaadmin

Oct 18, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

• लातूर जिल्ह्यात 15 ठिकाणी होणार दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

लातूर, दि. 17 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता राज्यातील 500 ग्रामपंचातींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील पंधरा मोठ्या ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम होणार आहे. जिथे ग्रामपंचायत निवडूक आहे, अशा गावासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती, काही अटी व शर्तीसह परवानगी मिळाली असून त्यांनी दिलेल्या अटी, शर्तीचे पालन करून हा कार्यक्रम केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव, शिरूर ताजबंद, औसा तालुक्यातील उजनी, किल्लारी, चाकूर तालुक्यातील नळेगाव, चापोली, देवणी तालुक्यातील वलांडी, जळकोट तालुक्यातील घोणसी, लातूर तालुक्यातील मुरुड, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, कासार सिरशी, रेणापूर तालुक्यातील पानगाव, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ आणि उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या मोठ्या ग्रामपंचायत स्तरावर हा कार्यक्रम होणार आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मैदान असेल तर मंडपाची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, वीज पुरवठा या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असून या कार्यक्रमाला खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचा प्रयत्न असेल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *