नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या 24 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या राज्यात आरोग्य यंत्रणेतील गोंधळाचीच चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यातील या मृत्यू प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नासल्याचा गंभीर आरोप केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले. त्यांचा व्हिडीओ मी माध्यमांना देते. गोळ्या दिल्या जातात, पण आम्ही खात नाही. पोषण आहार दिला जातो, आम्ही कधी खातो, कधी खात नाही. डॉक्टरांनी या गोळ्या घ्यायला सांगितल्या आहेत. त्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदुरुस्त असतं आणि तुमच्या मांडीवर खेळत असतं हे आम्ही त्यांना सांगितलं.”
“सरकार औषधं आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही”
“आपण औषधं आणि पोषण आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही. आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र, गर्भवती माता या गोळ्या घेतात की नाही इथून आपल्याला बघण्याची गरज आहे,” असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.