• Fri. May 2nd, 2025

“आंतरवली सराटी गावात आमच्यावर लाठीहल्ला…”, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल

Byjantaadmin

Oct 9, 2023

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. जे सरकारशी चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आलं. मात्र मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं त्यांचं आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं नाही. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक सवाल केला आहे. आंतरवली सराटी गावात आमच्यावर हल्ला का झाला? हा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांनी विचारला असून या प्रश्नाचं उत्तर सरकार देऊ शकलेलं नाही असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. रविवारी रात्री नाशिक येथील सीबीएस भागात जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ मनोज जरांगेंनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी हा सवाल सरकारला केला आहे.

What Manoj Jarange Patil Said?

 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा आरक्षणाची लढाई ही अनेक वर्षांपासून सुरु आहे. २९ ऑगस्टला आम्ही पु्न्हा एकदा हा लढा देण्यास सुरुवात केली. आपल्याला आरक्षण नको पण आपल्या नातवाला आरक्षण कामी येईल या भावनेतून अनेक महिलाही आरक्षणात सहभागी झाल्या होत्या. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. मात्र आमच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. तो का करण्यात आला? याचं उत्तर अद्यापही सरकार देऊ शकलेलं नाही.

चार महिन्यांचं बाळ असलेल्या आईचं डोकं फुटलं आणि…

चार महिन्यांचं बाळ असलेल्या आईचं डोकं फुटलं. त्या आईचं रक्त बाळाच्या अंगावर पडलं. काहींचे हात मोडले, पाय मोडले हा सगळा हल्ला आमच्यावर नव्हता. तर तो हल्ला संपूर्ण मराठा समाजावर करण्यात आला. आमचं असं काय चुकलं की आमच्यावर प्राणघातक हल्ला केला? शांततेत चाललेल्या आमच्या आंदोलनावर लाठीचार्ज का करण्यात आला? असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्यांना मी सोडणार नाही तो कुणीही असो मी मराठ्याची अवलाद आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात म्हटलं आहे.

आमची चूक तरी काय?

२९ ऑगस्टला जे आंदोलन सुरु केलं त्या आधीच आम्ही इशारा दिला होता. मला खुर्चीचा मोह नव्हता, मी व्यासपीठावर गेलो नव्हतो. मी शांत बसा म्हटलो तरी लोक शांत बसत होते. जालन्याचे कलेक्टर आणि एसपी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की असा मॉब शांत करणारा माणूस बघितला नाही. जर इतकं सगळं होतं तर मग आम्ही नंतर कसा काय धिंगाणा केला? मराठ्यांची अवलाद कधीही धिंगाणा करू शकत नाही पण सरकारने कधीच खुलासा केला नाही. आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या अशी मागणी केली तर चुकले काय ? आम्ही शांततेत आंदोलन केले ही आमची चूक होती का? १९२३ पासून मराठा आरक्षण आहे हे मागितले ही आमची चूक होती का? असेही प्रश्न आपल्या भाषणात मनोज जरांगेंनी विचारले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *