पुण्यात तीनदिवसीय मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव
पुणे(प्रतिनिधी):-आशय फिल्म क्लब व अभिजात फिल्म सोसायटीतर्फे नऊ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ४१ देशांतील दर्जेदार लघुपट पाहता येणार आहेत. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे मुंबा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक सचिन कुंडलकर यांच्या हस्ते नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वर्षीच्या महोत्सवात देश-विदेशातील ७० लघुपट दाखवले जाणार आहेत, अशी माहिती फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी महोत्सवाचे मुख्य आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक रश्मिता शहापूरकर उपस्थित होते.