सोलापूर: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांनी आपल्या भाषणातून भाजपवत हल्लाबोल केला. सोलापूर शहर उत्तर आणि यापूर्वीच्या खासदारांचा इतिहास सांगितला. सोलापुरातून नागेश वल्याळ, सुभाष देशमुख, मदनसिंह मोहिते पाटील (पप्पा) हे भाजपचे खासदार होते. जवळपास ४० वर्षांपासून भाजपचा उमेदवार सोलापुरात निवडून येत असताना भाजपवाले काँग्रेस व राष्ट्रवादीला विचारणा करतात. चाळीस वर्षे काय विकास केला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते. जयंत पाटलांनी सोलापुरातील शरद पवार गटाच्या विविध नेत्यांशी चर्चा आणि बैठका घेत संवाद साधला. शरद पवार गटाचे नेते महेश कोठेंनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील राजकारण कुठल्या थराला जाऊन पोहोचले आहे हे सर्वश्रुत आहे. भाजपवाले हे दाऊद इब्राहिमला देखील भाजपमध्ये प्रवेश देतील. देवेंद्र फडणवीस दाऊद इब्राहिमचं स्वागत करतील, अशी टीका महेश कोठेंनी भाषणातून बोलताना केली आहे.शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आहेत. गेल्या तीन टर्म पासून शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख भाजपकडून निवडून आले आहेत. त्या अगोदर शिवसेना आणि भाजपची युती असताना भाजपचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आला होता. शहर उत्तरमध्ये भाजप अनेक नगरसेवक पालिकेवर निवडून गेले आहेत. अशा भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा मेळावा संपन्न झाला.