• Wed. Apr 30th, 2025

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Byjantaadmin

Oct 4, 2023

सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना आणि खासदारांना विधानसभा निवडणुका लढण्यास सांगितलं असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातही असंच चित्र असल्याचं बोललं जात आहे. ज्यांना लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितलं जात आहे, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही नाव असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर आता स्वत: देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया दिली.

तुम्ही दिल्लीत जाण्यास उत्सुक आहात का? की तुम्हाला महाराष्ट्रातच काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट अशी आहे की, पक्ष जेव्हा म्हणेल दिल्लीत यावं लागेल, तेव्हा दिल्लीत जाईन. ज्यादिवशी पक्ष सांगेल की मुंबईत राहायचंय. तेव्हा मुंबईत राहीन. जेव्हा पक्ष म्हणेल, आता तुझी आवश्यकता नाही, तू नागपूरला जा, तेव्हा मी नागपूरला निघून जाईल. मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. पक्षच माझ्याबद्दल निर्णय घेतो. मी स्वत: निर्णय घेत नाही. त्यामुळे माझ्या उत्सुकतेचा विषयच येत नाही.”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “जी पतंगबाजी चालत आहे, त्यात काहीही सत्य नाही. पक्षाने असं कुणालाही म्हटलं नाही. शेवटी राजकीय वास्तविकतेला धरून अंतिम निर्णय घेतले जातात. राजकीय वास्तविकता हीच आहे की, माझ्या पक्षाने महाराष्ट्रात माझं नेतृत्व तयार केलं आहे. त्यामुळे मी आज महाराष्ट्राचा नेता आहे. ज्यादिवशी पक्षाला वाटेल दुसरा नेता तयार करायचा आहे, तेव्हा दुसरा नेता तयार केला जाईल.जोपर्यंत दुसरा नेता तयार केला जात नाही. तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता असेल. तसेच मी जेवढं राजकारण समजतो, त्यावरून मला वाटत नाही की मला दिल्लीत बोलावलं जाईल. त्यामुळे मी महाराष्ट्रातच काम करेन. महाराष्ट्रातलंच काम मला दिलं जाईल. महाराष्ट्रात मी पुन्हा आमचं सरकार निवडून आणेल,” असंही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed