मुंबई : मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणे आणि कांदिवलीतील मराठी महिलेचा गाळा गुजराती व्यापाऱ्याने हडप केल्याच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा मराठी भाषिक आणि मराठी माणसांचा मुद्दा चर्चेत आला आहे. गुजराती पाट्यांवरुन आधीच मुंबईमध्ये वाद सुरू असताना आता एअरटेलच्या गुजराती प्रेमामुळे मनसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात गुजराती भाषेत जाहिराती करता, गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिराती देणार का? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. मनसेच्या धडक मोर्चानंतर एअरटेलने माफीनामा देत या जाहिराती मागे घेणार असल्याची ग्वाही दिली.
एअरटेलची गुजराती भाषेत जाहिरात आणि मनसेचा धडक मोर्चा
एअरटेलने गुजराती भाषेत जाहिरात केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मालाडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मनसेचे विद्यार्थी संघटनेचे नेते अखिल चित्रे, सतीश नारकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी मालाड पश्चिमेकडे भारती एअरटेल कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील तैनात केला होता. यावेळी आंदोलकांनी एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा आग्रह धरल्यामुळे काही काळ पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माफी मागण्यास सांगितले असून गुजराती भाषेतील जाहिरात देखील हटवण्याची मागणी केली आहे.
मग यांच्या काचा फुटणार
मनसेचे अखिल चित्रे म्हणाले की,मुंबईत गुजराती भाषिक असल्याचा एअरटेलला वारंवार साक्षात्कार होतोय असं दिसतंय. त्यामुळे कधी बिल गुजराती भाषेत दिलं जातंय तर कधी जाहिरात केली जातेय. या माध्यमातून सातत्याने गुजराती भाषा लादली जातेय. गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिरात केली जाणार का? मनसेच्या मोर्चानंतर आता एअरटेलने माफीनामा दिला असून गुजराती भाषेतील जाहिराती बंद करणार असल्याची ग्वाही दिली आहे. यांना इतर भाषिकांचा पुळका असेल तर तिकडे जावं. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आवाहन केलं तर फायद्यापेक्षा तोटाच होणार, यांच्या काचा फुटणार.
हे मुद्दामहून सुरू आहे का?
मनसेने यासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काही प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये म्हटलंय की, हे मुद्दामहून सुरु आहे का ? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो ? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का?