धाराशिव : रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकारामुळे महादेव जानकर नाराज झाल्याचे समजते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेची आज तुळजाभवानी देवीच्या आरतीने सुरुवात झाली. मात्र तुळजा भवानीच्या गाभाऱ्यातील सुरक्षारक्षकांनी महादेव जानकरांना गाभाऱ्यात जाताना अडवल्याने जानकर यांनी संताप व्यक्त करत गाभाऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले.
गाभाऱ्यात प्रवेश न मिळाल्याने महादेव जानकर यांनी तुळजा भवानी मंदिर प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत तुळजा भवानी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जानकरांनी म्हटलं आहे.
काय आहे मंदिर प्रशासनाचे म्हणणे?
‘महादेव जानकर आले तेव्हा अभिषेक पूजा संपलेली होती. तसेच आरतीही सुरू होती. आरती सुरू असताना पुजाऱ्याशिवाय कोणालाच गाभाऱ्यात सोडले जात नाही. त्यामुळे जानकर यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला नाही,’ असे श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितलं आहे.दरम्यान, याआधीही संभाजीराजे छत्रपती यांना देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याने राज्यभरात मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता जानकर यांच्याबाबत तसाच प्रकार घडल्याने मंदिर प्रशासन पुन्हा एकदा वादात सापडले आहे.