• Tue. Apr 29th, 2025

नांदेड रुग्णालयात मृत्यूतांडव, हे मृत्यू नसून सरकारी हत्या; शासनावर ३०२ चे गुन्हे दाखल करा, नाना पटोले संतापले

Byjantaadmin

Oct 3, 2023

नांदेड : ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, जाहिरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल करत हे सरकारी अनास्थेचे बळी असून ३०२ चे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी समोर आले. मृतांमध्ये ६ मुले व ६ मुलींचा समावेश असल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. विरोधी पक्षांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Congress Leader Nana Patole Slam Maharashtra State Government Over Nanded Government Hospital 31 Death
सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी

मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाणे शासकीय रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच रात्री १८ मृत्यू झाले, त्यावर चौकशी समिती नेमली गेली त्या समितीचे काय झाले? एकाद्या डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचाऱ्याला निलंबित करुन हे प्रकार थांबणार नाहीत. संबंधित मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे मृत्यू होत असताना संबंधित खात्याचे मंत्री काय करतात? मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीशी संवेदना शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करावी असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed