मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील लातूर जिल्हा दौऱ्यावर, पाखरसांगवी येथे जाहीर सभा
लातूर :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातील आंदोलनातून सरकारची झोप उडविणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ०३ आणि ०४ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. बुधवार ०४ ऑक्टोबर रोजी दु. १२.३० त्यांची पाखरसांगवी, लातूर येथे जाहीर सभा होणार आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मराठा बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर निघालेले आहेत. ज्यात ते ०२ दिवस लातूर जिल्हा दौरा करणार आहेत. ०३ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातून ते लातूर जिल्ह्यातील किनगाव आणि अहमदपूर येथे येणार आहेत. तर बुधवार ०४ ऑक्टोबर रोजी अहमदपूर तालुक्यातील हंगरगा, शिरूर ताजबंद, चाकूर, लातूर येथे भेटी देत पाखरसांगवी येथे दु. १२.३० वा. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित जाहीर सभा घेणार आहेत. या जाहीर सभेत ते आपली आगामी भूमिका स्पष्ट करतील.
जालना येथील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविताना सरकारने त्यांना मराठा आरक्षणासाठी काही दिवसांचा अवधी मागितला होता. हा अवधी पूर्ण होण्यापूर्वी जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौरा करीत आहेत. पाखरसांगवी, लातूर येथील होणाऱ्या जाहीर सभेत ते मराठा आरक्षणा संदर्भात पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.त्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.