शौर्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• शौर्यदिनानिमित्त वीरमाता, वीरपिता, वीरपत्नींचा सन्मान
• माजी सैनिक पाल्यांना अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती वितरण
लातूर, (जिमाका) : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा होतो. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे, ले. कर्नल (नि.) बी. आर. हरणे, मेजर (नि) व्ही. व्ही. पटवारी यांच्यासह माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी आणि शौर्यपदक प्राप्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, अर्थसहाय्यचे धनादेश वितरीत करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आपले सर्वस्व पणाला लावून देशाच्या सीमेवर कर्तव्य बजाविणाऱ्या सैनिकांमुळे आपण सर्वजण सुरक्षितपणे जीवन जगत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सैनिकांचा, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाचा आदर केला पाहिजे. आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव कटीबद्ध असून दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी प्रत्येक तहसील कार्यालयात आजी-माजी सैनिकांच्या समस्या ऐकून घेण्यात येत असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच शौर्यदिन हा राष्ट्रप्रेमाची भावना जाज्वल्य करणारा दिवस असून यानिमित्ताने प्रत्येकाने आपल्या समाजासाठी, देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा निश्चय करावा, असे आवाहना त्यांनी यावेळी केले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी प्रास्ताविकामध्ये शौर्यदिन आयोजनाची पार्श्वभूमी विषद केली. तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक पाल्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य याबाबत माहिती दिली. दिपाली हरणे व त्यांच्या चमूने यावेळी विविध देशभक्तीपर गीते सादर केली.