• Tue. Apr 29th, 2025

कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारचं सतर्कतेचं आवाहन; मार्गदर्शक सूचना केल्या जारी!

Byjantaadmin

Sep 20, 2023

भारत व कॅनडा यांच्यातील वाद हळूहळू वाढू लागला आहे. हरदीपसिंग निज्जर याच्या हत्याप्रकरणावरून दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत असून आपापल्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करत आहेत. या वादात आधी दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता आपापल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. आधी कॅनडानं आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन केलं असताना आता भारतानं कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांindians in canada advisory on hardeep singh nijjar murder caseना तिथल्या परिस्थितीसंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

 

नेमकं काय घडलं?

जून महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भारताचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करत कॅनडा सरकारनं भारताच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. उत्तरादाखल भारत सरकारनं हे सर्व आरोप फेटाळतानाच कॅनडातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं नमूद करत कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.सऱ्याच दिवशी कॅनडानं आपल्या नागरिकांसाठीच्या प्रवासासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करत त्यात जम्मू-काश्मीरचा मुद्दा समाविष्ट केला. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा प्रश्न असून तिथे प्रवास करताना खबरदारी घेण्याची सूचना कॅनडा सरकारनं नागरिकांना केली. कॅनडाच्या या कृतीवर भारताकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते? याकडे लक्ष लागलेलं असतानाच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी सूचनापत्र जारी केलं आहे

कॅनडातील भारतीयांसाठी काय आहेत सूचना?

अरिंदम बागची यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सूचनांचं परिपत्रक ट्वीट केलं आहे. “कॅनडातील भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना”, असं या पत्रकाच्या सुरुवातीलाच नमूद केलं आहे.

भारत सरकारकडून जारी करण्यात आलेलं पत्रक! (फोटो सौजन्य – अरिंदम बागची यांच्या ट्विटर हँडलवरून)

“कॅनडामधील भारतविरोधोी कारवाया, राजकीय पुरस्कृत द्वेष-गुन्हे आणि हिंसाचार पाहाता तिथे राहणारे भारतीय नागरिक व तिथे जाऊ इच्छिणारे भारतीय यांनी अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. कॅनडातील भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना व भारतीय अधिकाऱ्यांना धोका पोहोचवण्याचे प्रयत्न झाले”, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

धोकादायक ठिकाणी प्रवास टाळा

“या सर्व घटनांमुळे अशा धोकादायक ठिकाणी किंवा तशा घटना ठरण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रवास करणं भारतीय नागरिकांनी टाळावं. तिथल्या भारतीयांच्या सुरक्षेची हमी निश्चित करण्यासाठी आपले उच्चायुक्त कॅनडा सरकारच्या संपर्कात कायम राहतील. कॅनडातील परिस्थिती पाहाता विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांनी अतिशय काळजी घेण्याची व कायम सतर्क राहण्याची गरज आहे”, असंही यात म्हटलं आहे.

“कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी ओट्टावामधील भारतीय उच्चायुक्त किंवा टोरंटो व व्हँकोव्हरमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाईटवर आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. याशिवाय, madad.gov.in या वेबसाईटवरही तुम्ही नोंदणी करू शकता. अशी नोंदणी केल्यास संकटाच्या प्रसंगी भारतीय उच्चायुक्तांना व दूतावासाला भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचणं सोपं होईल”, असंही भारत सरकारने कॅनडातील भारतीयांना या पत्रकाद्वारे कळवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed