• Tue. Apr 29th, 2025

सुप्रिया सुळे नैराश्यात, वैफल्यग्रस्त:अजित पवार यांच्या धक्कातंत्रातून त्या अद्याप सावरल्या नाही, सुनील तटकरे यांची तिखट टीका

Byjantaadmin

Sep 20, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना नैराश्याने घेरल्याची तिखट टीका पक्षाचे बंडखोर नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांना आलेले नैराश्य अद्याप दूर झाल्याचे दिसत नाही, असे ते म्हणालेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी संसदेत सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची खुली चौकशी करण्याचे आव्हान दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात एनसीपीचा उल्लेख नॅचरल करप्ट पार्टी असा केला होता. त्यानंतर भोपाळमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर सिंचन व बँक घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी या घोटाळ्यांची चौकशी करावी, असे त्या म्हणाल्या होत्या.

सुप्रिया सुळे यांना जबर धक्का

सु्प्रिया सुळे यांच्या चौकशीच्या मागणीमुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे. तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयाचा सुप्रिया सुळे यांना जबर धक्का बसला. त्या नैराश्यात गेल्या. त्यांचे नैराश्य अजून दूर झाल्याचे दिसत नाही.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाचे निर्णयही आलेत. सध्या त्या वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी विधाने करत आहेत. त्यांना हे विधान टाळता आले असते, असे तटकरे म्हणाले.

अजित पवारांच्या पाठिशी अवघा महाराष्ट्र

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अवघा महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा व विधान परिषदेतील सदस्यही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला दिवसागणिक पाठिंबा वाढत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

संसदेत माझे 1 नव्हे 800 भाऊ

दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करण्याची मागणी केली तेव्हा सत्ताधारी बाकावरून कुणीतरी अजित पवार यांचे नाव घेतले. त्यावर त्या म्हणाल्या की, ही नात्याची गोष्ट नाही. संसदेत माझे 1 नव्हे तर तब्बल 800 भाऊ आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी दुःख आहे. त्यांना भ्रष्टाचारमुक्त भारत हवा आहे. यासाठी आमची त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहण्याची तयारी आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed