देश एकसंघ ठेवून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ–माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर
लातूर –धर्म अनेक असले तरी आपला जन्म, तहान, भूक एक सारखीच आहे. धर्म म्हणजे असे ज्ञान आहे जे माणसाला तोडत नाही जोडत असते, अशी शिकवण आपण सर्वांना दिली तर मोठी ताकद मिळेल. जात, धर्म, भाषा याच्या नावाने देशाचे विभाजन होऊ न देता देश एकसंघ ठेवून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ असा विचार सर्वांनी करावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी रविवारी येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मध्ये बोलताना केले.श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, सचिव ॲड. आशिष बाजपाई, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी, संस्थेचे विश्वस्त हुकुमचंद कलंत्री, सूर्यप्रकाश धूत, शामसुंदर खटोड, चैतन्य भार्गव, आशिष अग्रवाल, स्नेहल उटगे, वंदना ईनानी, सुनील लोया, अनुप अग्रवाल, प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू, संस्थांतर्गत इतर शाळांचे मुख्याध्यापक यांची यावेळी उपस्थिती होती.जागतिक स्तरावर भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केली असल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर पुढे म्हणाले की, भारतावर अनेक वर्ष मुघल, इंग्रजांनी राज्य असतानाही आपल्या पूर्वजांनी देशाला एकत्र करण्याची काम केले. देशात अनेक धर्माचे विचार असताना आपण एकच आहोत ही भावना जागृत ठेवली. पूर्वी अमेरिकेतून अन्नधान्य आणावे लागायचे परंतु आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत देश आत्मनिर्भर झाला असून 140 कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा करून देखील बाहेरच्या देशाला पुरवठा करू शकतो. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन, मिलिटरी बॅन्डचे प्रात्यक्षिक, लेझीम सादरीकरणाचे कौतुक करून चाकूरकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर आणि प्रभावी सादरीकरण केले असून असाच कार्यक्रम संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिल्लीमध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी होतो प्रारंभी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत विभागाने प्रेरणा गीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. स्पंदन सुधीर वडगावकर या विद्यार्थ्याने श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सेठ पूरणमलजी लाहोटी यांचे स्वगत सादर केले. आदित्य बाजपाई याने मराठवाडा मुक्तिसंग्राम लढयातील अग्रणी स्वर्गीय चंद्रशेखरदादा बाजपाई यांचे योगदान याविषयी विचार मांडले. याप्रसंगी मराठी निबंध स्पर्धा, समुह गायन स्पर्धेतील विजेत्या सह इत्रा गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देउन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सार्थक दिवे व गायत्री मोरे या विद्यार्थ्यांनी केले.