• Wed. Apr 30th, 2025

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Byjantaadmin

Sep 15, 2023

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

लातूर, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सुविधेनुसार विद्यार्थी 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या काळात नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावे लागेल. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याची पोचपावती एक छायाप्रत मूळ कागदपत्रे व यादी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करावी.

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही. इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच हे अर्ज भरावयाचे आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. तसेच संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावीत.

खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी 600 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. इयत्ता दहावी, इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय माध्यमिक शाळांची यादी दिसेल, त्यापैकी विद्यार्थ्यांची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची शाळेची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. या वर्षापासून संपर्क केंद्र पद्धत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे.

इयत्ता दहावी व इयत्ता बारावी फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी प्रविष्ठ खाजगी विद्यार्थी फॉर्म न. 17 नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वतःकडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस, कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची असल्यास विद्यार्थ्यास पुन्हा नावनोंदणी शुल्क ऑनलाइन जमा करावे लागेल याची नोंद घ्यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकीत्सकाच्या अथवा प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी. तसेच आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.  अनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.

पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे  मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थी नियमित शुल्काने नावनोंदणी करण्याकरिता अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे पुणे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed