• Wed. Apr 30th, 2025

मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी शेतकरी योजनेची लाभार्थी:केंद्राकडून 10 कोटींचे अनुदान मिळाले

Byjantaadmin

Sep 15, 2023

किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांची मुलगी ही मुख्य लाभार्थी आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजयकुमार गावित यांची मुलगी सुप्रिया गावित यांच्या मुलीच्या कंपनीला केंद्र सरकारकडून योजने अंतर्गत दहा कोटी रुपयांचे अनुदानही मिळाले आहे, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला.

लाभार्थ्यांची यादीच ट्विट केली

विजय वडेट्टीवार यांनी किसान संपदा योजनेच्या लाभार्थ्यांची यादीही ट्विट केली आहे. त्याचा हवाला देत विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की, सुप्रिया गावित यांच्या “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनीला दहा कोटीची सबसिडी मिळाली. एवढेच नव्हे तर भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे.

योजना शेतकऱ्यांची, लाभार्थी भाजप मंत्री

यादी ट्विट करत ​​​​​विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, किसान संपदा योजना शेतकऱ्यांची आहे. लाभार्थी यादी मात्र भाजप मंत्र्यांची आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ही योजना आहे. योजनेचा लाभ मात्र भाजप नेते घेत आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढले नाही, भाजपात भरती झालेल्या नेत्यांचे उत्पन्न कोटींनी वाढले हे मात्र खरे आहे.

हाच परिवारवाद संपवायचा आहे का?

विजय वडेट्टीवार म्हणाले, जिथे लाभ तिथे भाजप परिवार. वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का? ना खाऊंगा ना खाने दुंगाचा ढोल वाजवत मते घेणाऱ्या सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही.. २०२३ मध्ये मोदी सरकारचा नारा बदलून “तुम भी खाओ मैं भी खाऊंगा” असे झाले काय?

कुंपणच शेत खाते

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणाले की, जेव्हा कुंपणच शेत खाते असा हा प्रकार आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने APC योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आणि लाभार्थी आहे- महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांची “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनी. पंतप्रधान स्वतःला “प्रधान सेवक” म्हणवतात आणि त्यांच्या पक्षाचे लोक “शेख अपनी देख” तत्वज्ञानावर विश्वास ठेवत प्रथम स्वयंसेवेत रमतात. सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही.. हा भाजपाचा ‘परिवारवाद’ नव्हे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed