• Thu. May 1st, 2025

राज्यात शुक्रवार पासून मॉन्सून होणार सक्रिय! ‘या’ जिल्ह्यात बरसणार

Byjantaadmin

Sep 13, 2023
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

राज्यात दहिहंडी नंतर गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. चारही विभागांत कुठे हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात मॉन्सून सक्रिय होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आहे.पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की उत्तर प्रदेशावर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात असणाऱ्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची प्रक्रिया सुरू असून ते मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज असल्याने आज कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या अन्य भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार,१८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

विदर्भातील यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, अमरावती अकोला जिल्ह्यात आज पासून पुढील १६ तारखेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात १४ ते १६ दरम्यान, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकण गोव्यात १६ तारखेला, विदर्भात १३ ते १६ तारखेला तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात १४ ते १६ तारखेला मेघगर्जणेसह वीजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत वातावरण ढगाळ राहून हलका ते अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ तारखेला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर १५ आणि १६ तारखेला घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी वातावरण हे दमट राहणार असल्याने वातावरणातील उकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *