नागपूर : गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पारडी परिसरात सापळा रचून एक कोटीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ओडिशाहून बिडला एक कोटीचा गांजा जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेला कारवाईचे निर्देश दिले
अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारडी पुलाजवळ सापळा रचला. पोलिसांना एका ट्रकवर संशय आला. त्यांनी ट्रक थांबविला. तपासणी केली असता ट्रकमध्ये पोत्यात १५०० किलो गांजा आढळला. पोलिसांनी गांजा जप्त करून दोघांना अटक केली. स्थानिक पोलिसांनी बिड पोलिसांशी संपर्क साधून तेथेही दोघांना अटक केली. बीडमधून हा गांजा कोणाला देण्यात येणार होता, याचा तपास पोलिस करीत आहेत