मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत अनेकदा आपले सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत गंभीर असल्याचा पुनरुच्चार केला आहे. पण त्यांच्या एका व्हिडिओमुळे त्यांच्याच दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे असे म्हणताना दिसून येत आहेत. त्यांचा यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ प्रकरणी या तिन्ही नेत्यांना ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओत शिंदे आपण केवळ बोलून मोकळे व्हायचे, असे म्हणताना दिसून येत आहेत.
काय आहे या व्हिडिओत?
या व्हिडिओत मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्यात नेमका कोणता संवाद झाला हे खाली वाचा…
मुख्यमंत्री शिंदे -आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.
अजित पवार – हो……येस
देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.
संभाजी भिडेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांनी मंगळवारी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे लबाड नाहीत, फडणवीस फसवणूक करणार नाहीत, तर अजित पवार काळीज असणारा माणूस असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याचीही विनंती केली होती. त्यांच्या या दाव्याचा संदर्भ देत नेटकरी या व्हिडिओवरून या तिन्ही नेत्यांना ट्रोल करत आहेत.
ठाकरे गटाचा हल्लाबोल
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही या व्हिडिओप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या 3 प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षणासंबंधी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय, असेही निंबाळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत. आता या प्रकरणी सरकारतर्फे कोणती प्रतिक्रिया येत आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.