• Wed. May 7th, 2025

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; सीएमएमआरएफ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

Byjantaadmin

Sep 11, 2023

मुंबई,  : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, तर ऑगस्ट मध्ये विक्रमी १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *