निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील गुंजरगा येथील तेरणा नदी पात्रावरील उच्चस्तरीय बंधाऱ्याचे दोन दरवाज्याच्या गेअर बॉक्स मध्ये नटबोल्ट टाकून अज्ञात व्यक्तीने दरवाजे जाम केले होते. यामध्ये जलसंपदा विभागाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.या संदर्भात येथील औराद शहाजानी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्यादीमध्ये अज्ञात व्यक्तीच्या ऐवजी आरोपीचे नाव टाकून मोठे साहेब आल्यानंतर फिर्याद द्या असे सांगत फिर्यादिस परत पाठवल्याने जलसंपदा विभागाने स्पीड पोस्टाने फिर्याद पाठवून दिली . मात्र अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि 20 व 21 ऑक्टोबर दरम्यान तेरणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व नदीपात्राशेजारील पाण्याचा प्रवाह वाढला होता. यातच जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. सदर उच्चस्तरीय बॅरेजचे गेट काडणे , सोडणे व देखभाल दुरुस्तीचे काम यु बी ढेंगळे या एजन्सीला दिलेली आहे. दि 22 ऑक्टोबर रोजी बॅरेज वरील गार्ड प्रात विधीस गेल्याची संधी पाहून अज्ञात इसमाने दोन दरवाज्याच्या गिअर बॉक्स मध्ये नटबोल्ट लोखंडी तुकडे टाकून बॅरेजचे दोन्ही दार जाम केले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जलसंपदाचे उपविभागीय अभियंता मुळे यांनी तात्काळ यांत्रिक विभागाच्य टीम बोलावून सदर दुरुस्ती केली. यामध्ये साधारणता तीन लाख रुपयांचे जलसंपदाचे नुकसान झाले आहे. याबाबत एजन्सीचे मीथून मदने व जलसंपदाचे सय्यद येरुळे यांनी येथील औराद येथील पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्यादीस अज्ञात इसमा ऐवजी आरोपीचे नाव टाकून मोठे साहेब आल्यानंतर फिर्याद घेऊन या असे म्हणत चिटबोने या पोलीस कर्मचाऱ्यांने परत पाठवले असल्याची माहिती सय्यद यांनी दिली. एखाद्या शासकीय विभागाची फिर्याद नोंदवली जात नसेल, तर खाकीचा सद्रक्षणायः खलनिगृहणायः सर्वसामान्यांच्या फिर्यादीचे काय असा नागरिकातून संताप व्यक्त करीत शासकीय विभागाची फिर्याद घेतली जात नसेल तर सामान्य नागरिकांच्या फिर्यादीबद्दल प्रशासनाचे का ‘ मत असेल याबाबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा आहे . नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नागरिकांचे का ‘ मत बदलतील का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे .
याबाबत उपविभागीय अभियंता मुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की ,एजन्सीच्या व डिपार्टमेंटच्या माणसास पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास पाठवले होते . मात्र त्यांनी फिर्याद स्वीकारली नाही म्हणून फिर्याद पुन्हा स्पीड पोस्ट ने पाठवलेली आहे. शिवाय यापूर्वीही औराद येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे पाच गेट चोरीला गेलेली फिर्याद दिले असता ती फिर्याद औराद पोलीस स्टेशनला स्वीकारलेली नाही. सदर गेटचा अद्याप तपास झालेला नाही.
याबाबत कार्यकारी अभीयंता रोहित जगताप म्हणाले की शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची फिर्याद पोलीस प्रशासनाने घेणे अपेक्षित असल्याचे म्हणाले .