खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी यांचा सन्मान
लातूर : तत्कालीन लातूर – धाराशिव जिल्ह्यातील पहिले पत्रकार तथा मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी यांचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
खा. सुप्रिया सुळे आपल्या नियोजित लातूर दौऱ्यावर आल्या असताना येत्या दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करण्यात येणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. मुक्तीसंग्रामातील शहरकर गुरुजींच्या अतुलनीय योगदानाबद्दल आपण सर्वजण कायमस्वरूपी त्यांच्या ऋणात असल्याचे सांगून खा. सुळे यांनी शाल – श्रीफळ – स्मृतिचिन्ह प्रदान करून पुष्पहाराने गुरुजींचा सन्मान केला. गुरुजींच्या प्रकृतीची अत्यंत आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांनी गुरुजींसोबत संवादही सा धला. यावेळी जीवनधर शहरकर गुरुजींनी मुक्तीसंग्रामातील अनेक आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, प्रदेश सचिव संजय शेटे, पक्ष निरीक्षक नरेंद्र काळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.