बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस काबीज केलं आहे. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्याJAWAN या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर सध्या ‘जवान’चाच बोलबाला आहे. अशातच महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हेसुद्धा त्याच्याबद्दल ट्विट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. आनंद महिंद्रा यांनी नुकतंच ट्विट करत शाहरुख खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांचा अनोखा आणि मजेशीर अंदाज पाहायला मिळाला. त्यावर शाहरुखनेही आपल्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. आनंद महिंद्रा आणि शाहरुख यांच्यातील ट्विटरवरील हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.जवान या चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर लॉन्च करण्यात आला. यावेळी तिथे शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग पाहायला मिळाला. दुबई आणि सौदी अरेबियामध्ये शाहरुखचे असंख्य चाहते आहेत. शाहरुख सोबतच भारतीय सिनेमा हा परदेशात किती लोकप्रिय आहे, त्याचीही प्रचिती जवानच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान आली. त्याचाच व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आपला या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी सुचवलं की शाहरुख खानला त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना आपल्या चित्रपटाद्वारे एकत्र आणण्याच्या क्षमतेमुळे त्याला नैसर्गिक संसाधन म्हणून घोषित केलं जावं.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘सर्व देश त्यांच्या नैसर्गिक खनिज संसाधनांचं रक्षण करतात आणि सामान्यतः विदेशी मुद्रा मिळवण्यासाठी त्यांचं खनन करून निर्यात करतात. आता शाहरुख खानला नैसर्गिक संसाधन म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे.’ आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर शाहरुखनेही लगेच प्रत्युत्तर दिलं. त्याने लिहिलं, ‘तुमचे खूप खूप आभार. चित्रपट बनवण्याच्या बाबतीत आपल्या देशाला अभिमान वाटावा यासाठी मी माझा छोटासा प्रयत्न करतोय आणि आशा आहे की एक नैसर्गिक संसाधन म्हणून मी मर्यादित नाही. सर तुम्हाला माझ्याकडून मोठी मिठी.’
प्रदर्शनाच्या दिवशी ‘जवान’ने तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित किंग खानचं कौतुक केलं आहे. दक्षिण भारतातही शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत आहे. शाहरुखने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘जवान’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.