कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आजरा तालुक्यातील भाजप पदाधिकारी निवडीमध्ये जुन्या आणि निष्ठावंत डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी पक्षाचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, भाजप कार्यालयाचा फलकही काढून ठेवण्यात आला आहे. निष्ठावंतांच्या या पवित्र्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा गृहजिल्हा असलेल्या कोल्हापूर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.भाजपच्या पदाधिकारी निवडीवरून आजरा तालुक्यात वादाची ठिणगी पडली आहे. जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी नव्या निवडीबाबत संताप व्यक्त करत जिल्हा पातळीवरील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आजरा bjp मध्ये अनेक वर्षांपासून धूसफुस सुरू होती. नव्या निवडीच्या निमित्ताने ती सर्वांसमोर आली आहे. वरिष्ठ नेतेमंडळींकडून आमची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोपही तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यातूनच पक्षाचे कार्यालय बंद करून नामफलकही काढून ठेवण्यात आलेला आहे
आजरा तालुका भाजपधील खांदेपालटबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. पडद्यामागे तशा हालचालीही सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी kolhapur मधील वरिष्ठ नेत्यांनी अखेर आजरा भाजपमध्ये खांदेपालट केली. त्यात निष्ठावंतांना डावलल्याचे तीव्र पडसाद अवघ्या दोन दिवसांतच तालुक्यात उमटले. तालुक्यातील पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत नव्या निवडीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.पदाधिकारी निवडीमध्ये जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नव्या बदलामध्ये डावलण्यात आले आहे, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. आजरा-गडहिंग्लज मार्गावरील भाजपच्या तालुका कार्यालयात हे नाराज कार्यकर्ते जमले. त्यांनी पहिल्यांदा भाजप कार्यालयाचा नामफलक उतरवला. त्यानंतर भाजपचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.