सत्ताधारी भाजपच्या राज्यातील लोकसभा व विधानसभेच्या तब्बल 40 टक्के जागा धोक्यात सापडल्याचा दावा भाजपने केलेल्या एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत. पण स्थानिक उमेदवार बदला, असा निष्कर्ष या सर्वेद्वारे समोर आला आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यमान आमदार – खासदारांसह भाजपचीही धाकधूक वाढली आहे.
अजित पवार सरकारमध्ये सहभागी केल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींनी काही राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यात सर्वे केला होता. त्यात प्रत्येक मतदार संघातील राजकीय परिस्थिती, आमदार – खासदारांचे कार्य, जनता व पदाधिकाऱ्यांशी वर्तन, समाजमाध्यमांवरील सहभाग, जनतेचे मोदी व आमदार-खासदारांविषयीचे मत आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी आमदारांशी चर्चा करून त्यांच्या कामाचा आढावा घेतला.
खासदार आमदारांना रिपोर्ट कार्ड दिले
या बैठकीत सर्वच आमदार, खासदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड देण्यात आले. तसेच त्याविषयी बाहेर कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली, असा दावा एका ऑनलाईन वृत्तपत्राने सूत्रांचा दाखला देत केला आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये लोकप्रतिनिधींच्या कामानुसार त्यांना श्रेणी देण्यात आल्यात. त्यांचा मतदार संघ भाजपसाठी किती सुरक्षित आहे की धोक्यात आहे, याचा उल्लेख करण्यात आला आहे.
भाजप विधानसभेच्या 170 जागा लढवणार
भाजपने विधानसभेच्या तब्बल 170 जागा लढवण्याची तयार केल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. भाजप शिवसेनेच्या शिंदे व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फाशा देणार नाही. तो स्वतः 170 च्या आसपास जागा लढवेल. त्यानंतर उरलेल्या जागा शिंदे व पवार गटाला विभागून देण्यात येतील. यातही या दोन्ही गटांच्या विद्यमान आमदार खासदारांशिवाय फारशा जागा दिल्या जाणार नाहीत, असेही सांगितले जात आहे.
मोदींना पसंती, उमेदवारांना नापसंती
या सर्वेक्षणानुसार, जवळपास 50 ते 60 टक्के मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली आहे. पण त्यांनी स्थानिक उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात व त्यानंतर आरोग्याच्या आघाडीवर कोणतीही मदत केली नाही. याशिवाय इतर कामे करण्यातही त्यांनी रस दाखवला नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.
भाजपने सर्वे घेतला गांभिर्याने
मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक वगळता अन्य कोणत्याही खासदाराला उपनगरी रेल्वे व रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची जाण नाही, असा एक महत्त्वाचा निष्कर्षही नोंदवण्यात आला आहे. भाजपने हा सर्वे अत्यंत गंभीरपणे घतेला आहे. त्यानुसार आमदार खासदारांना त्यांच्या श्रेणीनुसार उमेदवारी द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही सूत्रांनी सांगितल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.