पुणे : पुण्यात सध्या पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने नुकताच मोर्चा काढत पुण्यातील कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आंदोलनादरम्यान केली होती. आत घुसलो तर अधिकार्यांना कुठे पळायचं कळणार नाही. पुन्हा महापालिका आयुक्तांना ‘लव्हलेटर’ पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार राहा, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला होता. तर आपला ‘बॉस’ सागर बंगल्यावर बसलाय, आपण काहीही केलं तरी सहीसलामत बाहेर पडू, असं म्हणत पुण्यातील आंदोलनात भडकाऊ भाषण केले होते.यानंतर आता नितेश राणे यांच्या भाषणावर भाजपचेच उपाध्यक्ष संजय काकडे यांनी प्रतिक्रिया देत नितेश राणे यांना चांगलंच झापलं आहे. राणे यांची बुद्धी काढत संजय काकडे यांनी नितेश राणे यांना खडे बोल सुनावले आहेत. नितेश राणे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आणि बुद्धी नसलेले असल्याचं काकडे म्हणाले आहेत.
नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचं आणि बुद्धी नसलेलं
नितेश राणे जर कापाकापीची भाषा करत असतील तर मी त्याचा निषेध करतो. जे काही अनधिकृत बांधकाम असेल त्यावर अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात येईल. आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करू. ते कायद्यात असेल ते काम करतील. कोणी काही म्हणत असो मात्र देवेंद्र फडणवीस हे चुकीच्या कार्याला थारा देणार नाहीत. नितेश राणे जर म्हणत असतील आम्ही कापाकापी केले तर देवेंद्र फडणवीस मला मदत करतील तर असं काहीही नाहीये. नितेश राणे यांचे हे वक्तव्य बालिशपणाचं आणि बुद्धी नसलेलं आहे, अशा शब्दात संजय काकडे यांनी नितेश यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे.
नितेश राणे यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार
नितेश राणे यांचा वाक्य मी पुन्हा ऐकणार आहे. चुकीचं असेल तर त्याविषयी मी पक्ष श्रेष्ठींना पत्र लिहिणार आहे. ते वाक्य आपल्या पक्षाची प्रतिमा चांगली करत नसून पक्षाची प्रतिमा मलिन करत आहे, असे स्पष्ट सांगणार आहे. नितेश राणे जर काही कापाकापी बद्दल बोलले असतील तर त्याचा निषेध मी आधीच केला आहे. प्रशासकाबद्दल आमच्या मनात काहीच कटुता नाही. त्यामुळे प्रशासकाची योग्य भूमिका आमच्या पक्षाला मान्य असेल, असं म्हणून संजय काकडे यांनी नितेश राणे यांना पुण्येश्वराच्या मुद्द्यावरून जोरदार फटकार लगावली आहे.