केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष नाव, चिन्ह गोठवल्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने आज फेटाळली. निवडणूक आयोगाला तातडीने यासंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
याचिकेतील मागण्या
धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 8 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गोठवून शिंदे गट आणि ठाकरे गटाला स्वतंत्र चिन्ह आणि नाव दिले होते. हा निर्णय घाई घाईने घेतला. नियमांचे पालन या निर्णयावेळी झाले नाही. आता अंधेरी पोट निवडणूकही संपली. ज्या कारणासाठी धनुष्यबाण गोठवले तेच कारण आता राहीलेले नाही असे याचिकेत म्हटले होते.
निवडणूक आयोगाला अधिकार
निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा अधिकार असून कोर्टाच्या आदेशानंतर अंतिम निर्णय आयोगाला तातडीने घ्यावा लागणार आहे. चिन्ह गोठवताना आमची बाजू ऐकली नाही. समोरासमोर युक्तिवाद न ऐकता निर्णय घेतला. जरी अधिकार मान्य असले तरी प्रक्रीयांबाबत ठाकरे गटाला आक्षेप होते.
आयोगातच लढाई
आयोगाच्या कामकाजात न्यायालय दखल घेणार नाही हे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय तात्पूरता निर्णय झाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे आता चिन्हावरील लढाई ही निवडणूक आयोगातच राहील हे स्पष्ट झाले असून चिन्ह कुणाच्या पारड्यात जाईल हे निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.