नवी दिल्ली : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल तथा प्रसिद्ध विधीज्ञ हरिश साळवे हे नुकतेच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. लंडनमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला हायप्रोफाईल लोकांनी हजेरी लावली होती.यामध्ये नीता अंबानी, लक्ष्मी मित्तल आणि मॉडेल उज्ज्वला राऊत यांच्यासह आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदीनं देखील हजेरी लावली. मोदी सध्या आर्थिक घोटाळाप्रकरणी फरार आहे. पण तरीही तो भारतातील बड्या लोकांना भेटत असल्यानं त्याला नेमकं कोण वाचवतंय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
ललित मोदी सध्या लंडनमध्ये वास्तव्याला आहे. सन २०१० मध्ये त्यानं भारत सोडला, कर चुकवेगिरी आणि आर्थिक घोटाळ्याचे त्याच्यावर आरोप आहेत. पण हाच घोटाळेबाज फरार ललित मोदी परदेशात भारतीय उद्योगपतींना भेटत असल्यानं विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.भारतातील वरिष्ठ वकिलांपैकी एक असलेल्या हरिश साळवे यांची नुकतीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील ‘एक देश, एक निवडणूक’ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळं सरकारशी जवळचे संबंध असलेल्या साळवे यांच्यासोबत फरार ललित मोदी दिसून आल्यानं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे
शिवसेनेचा हल्लाबोल
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं, “भाजपच्या सरकारी वकिलानं तिसर्यांदा लग्न केलं आणि नंतर मोदी सरकारच्यावतीनं एकसमान विवाह कायदे, बहुपत्नीत्व इत्यादींवर अतिशय सोयीस्करपणे विधानं केली.परंतु निमंत्रित म्हणून भारतीय कायद्यातून पळून जाणाऱ्या एका फरार व्यक्तीनं त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावावी याची प्रत्येकाला चिंता वाटायला हवी. ललित मोदी सरकारच्या आवडत्या वकिलाचं लग्न साजरं करत आहे. नेमकं कोण कोणाला मदत करतंय? कोण कोणाचं रक्षण करतंय? हा प्रश्नच आता उरलेला नाही,” असं ट्विट चतुर्वेदींनी केलं आहे.