जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर सरकारने आता आंदोलकांना आरक्षण जाहीर करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी मागितला आहे. यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. 30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी ते शक्य नाही. ही शुद्ध धूळफेक आहे. मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याच काम सरकारने करु नये. सरकार एक भूमिका मांडत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. त्यामुळे राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र, आज माझे वक्तव्य आणि भूमिका स्पष्ट असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही
माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भले, माझा जीव गेला तरी चालेल. सरकारने गैरसमज पसरवू नये. सरकार एक भूमिका मांडत आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वेगळे बोलत आहेत. ते लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, दोन समाजात भांडण लावायची काम करता का? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पाठिंबा दर्शवताना घातली अट
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे सुरु मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण ओबीसींचाही टक्का वाढवा अशी आमची मागणी असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.