विलासराव देशमुख परदेशात असताना एक फोन वर पीकविमा मिळाला होता
खबरदार!शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर….
निलंगा- सध्याचे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही. महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये चाळीस दिवसापासून पाऊस नसल्यामुळे खरिप पीक पूर्णतः वाया गेले आहेत. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडू, असा इशारा काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी दिला.दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी त्यांना एक फोन केला आणि आठ दिवसात पीकविमा मिळाला होता, अशी आठवणही निलंगेकर यांनी सांगितली पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार संवेदनशील होते. त्यावेळी टंचाईसदृष्य स्थितीत आठव्या दिवशीच पीकविमा मंजूर झाला होता.पाऊस नसल्यामुळे दुष्काळ जाहीर करावा,पीकविमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी, जनावरांसाठी चारा द्यावा, विध्यार्थांची शैक्षणिक फी माफ करावी, विजबिल माफ करावे, भारनियमन करू नये आदी मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पावसाचा मोठा खंड पडल्याने नगदी पिकं हातची गेली आहेत.आता पाऊस पडूनही काहीच उपयोग नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. राज्य शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेतील अग्रीम रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी करूनही सरकार गांभीर्याने घेत नाही, असा आरोप अशोक पाटील निलंगेकर यांनी केला. मराठा समाजाचे लोकशाही पध्दतीने आंदोलन झाले शिवाय ५८ मोर्चे निघाले. त्या दरम्यान कोणतीही घटना अथवा अनुचीत प्रकार घडला नाही.दुष्काळावरचे लक्ष विचलीत करण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न केला गेला. शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच नसेल तर बाजार कसा चालणार? त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका, असे आवाहन निलंगेकर यांनी केले. आपण जर असेच चुकीच्या लोकांना मतदान करून निवडून आणले तर वरचा देव खाली आला तरी तुम्ही वाचणार नाही. वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही, असेही निलंगेकर म्हणाले.