• Tue. Apr 29th, 2025

‘मुंबईतून आदेश आल्यानेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न’-पृथ्वीराज चव्हाण

Byjantaadmin

Sep 2, 2023

जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे.

आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून

या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पत्रात लिहिले की, ‘जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते.

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजप ने आतापर्यंत फक्त पोकळ घोषणा केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार का आरक्षण देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून शंततापूर्वक आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला गेला आहे.

मराठा तरूणांवर आज झालेली लाठीचार्जची घटना निंदनीय असून ह्या घटनेची तात्काळ न्यायालीन चौकशी झाली पाहिजे तसेच ह्या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed