सोलापूर : सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (आहेरवाडी) येथे सिमेंट-खडी-वाळू मिसळलेले माल वाहतूक करणारे ४० टनी वजनाचे बल्कर वाहन पालथे होऊन त्यात एका शालेय मुलीसह चौघा निष्पापांचा चेंगरून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जीवघेण्या जड वाहतुकीच्या विरोधात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास औज- आहेरवाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर एसटी बस थांब्यावर काही शालेय मुलांसह गावकरी एसटी बसची वाट पाहात थांबले होते. तेव्हा भरधाव वेगात आलेला बल्कर (एमएच ०४ एएल ३०३५) अचानकपणे पालथा झाला. तेव्हा तेथे मोठा हाहाःकार उडाला. बल्करखाली चौघेजण चेंगरून जागीच मृत्युमुखी पडले. मृतांपैकी प्रज्ञा बसवराज दोडमले (वय ९) आणि विठ्ठल शिंगाडे (वय ६०, दोघे रा. औज) यांची औळख पटली असून अन्य दोघा मृतदेहांची ओळख दुपारी उशिरापर्यंत पटली नव्हती.
सोलापूर-होटगी-आहेरवाडी-फताटेवाडी या रस्त्यावर सात ते आठ सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. लगतच एनटीपीसी औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे या भागात दिवसरात्र जड वाहतूक होत असते. सिमेंट-खडी-वाळू मिसळून तयार झालेले बांधकाम साहित्य ३० ते ४० टन वजनाच्या बल्करसारख्या अतिजड वाहनांतून वाहून नेले जाते. या जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अवजड साहित्य वाहून नेले जात असल्यामुळे येथील रस्ते लवकर खराब होतात. स्थानिक गावकऱ्यांची विशेषतः शालेय मुला-मुलींची सुरक्षितता धोक्यात असते. अधुनमधून या भागात छोटे-मोठे जीवघेणे अपघात घडतात. या प्रश्नावर औज-आहेरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन केले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाही गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.