मुंबई दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीच्या आयोजन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व केलं. या बैठकीनंतर इंडिया आघाडीची बैठक पत्रकार परिषद पार पडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बैठकांमध्ये काय-काय निर्णय घेतले याबद्दल थोडक्यात माहिती दिली.
समन्वय समितीचे सदस्यांची नावे
- केसी वेणुगोपाल, काँग्रेस
- शरद पवार, राष्ट्रवादी
- टीआर बालू, डीएमके
- हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चा
- संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट
- तेजस्वी यादव, आरजेडी
- अभिषेक बॅनर्जी, टीएमसी
- राघव चढ्ढा, आप
- जावेद अली खान, समाजवादी पार्टी
- ललन सिंह, जनता दल युनायटेड
- डी राजा, सीपीआय
- ओमर अब्दुला, नॅशनल कॉन्फरन्स
- मेहबुबा मुफ्ती, पीडीपी
- सीपीआयच्या एका नेत्याचं नाव लवकरच जाहीर करणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
इंडिया मजबूत होत आहे. आम्ही एकत्र येतो तर एक-एक पावलं पुढे जात आहोत. त्यामुळे विरोधकांना धडकी भरत आहेत. इंडियाच्या विरोधी कोण ते सर्वांना माहिती आहे. आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. काही समितींची स्थापना केली. येणाऱ्या लढाईत तानाशाही, भ्रष्टाचारच्या विरोधात लढू. आम्ही मित्र, परिवारवादाच्या विरोधातही लढू. भारत माझं कुटुंब आहे. ही लढाई तीव्र होत जाईल.एक भीती आहे. एक विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आम्ही लोकांना विश्वास देतो की, भयमुक्त भारतासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. तुम्ही सर्व पाहत आहात की, कसा अत्याचा होत आहे. सिलेंडरचे दर कमी झाले पण याआधी भाव किती वाढले. पाच वर्ष लूट केली आणि निवडणुकीच्यावेळी सूट. अनेक मुद्दे आहेत आम्ही एकत्र होऊन लढू. इंडिया आणि भारताला आम्ही जिंकून देऊ. आपल्या सर्वांची ही लढाई आहे.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?
आजची बैठक खूप चांगल्याप्रकारे झाली. या बैठकीचा उद्देश काय होता ते उद्धव ठाकरे यांनी सांगितला आहे. आम्ही यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. मी जेव्हा बंगळुरुत होतो तेव्हादेखील जी बैठक झाली होती, त्याआधी पाटण्यातही बैठक झाली होती. त्याआधी माझ्या घरी तयारीसाठी बैठक पार पडली होती. सर्व नेत्यांनी मिळून चर्चा केली. त्यानंतर पाटण्यात पहिली बैठक पार पडली. त्या बैठकीत अजेंडा तयार करण्याचं ठरलं. मग बंगळुरुत बैठक झाली.
मुंबईत सर्वांनी आपापलं मत मांडलं. सर्वांना महागाई कमी करायची इच्छा आहे. बेरोजगारीविरोधात लढायचं आहे. मोदीजी नेहमी १०० रुपये वाढवतात आणि २ रुपये कमी करतात. पेट्रोल, गॅसचे जे दर डबल झाले आहेत. पण त्यांनी फक्त २०० रुपये कमी केले. पण त्यांनी गरिबांकडून चोरी करुन लाखो रुपये कमवले. त्यानंतर लोकांना दाखवायला २०० रुपये कमी करायचे आणि सांगायचं आणि गरिबांसाठी काम करतो.ते गरिबांसाठी कधीच काम करणार नाहीत. ते गरिबांच्या विरोधात काम करतात. मोठमोठ्या उद्योगपतींसोबत ते काम करतात. राहुल गांधींनी कालच एक रिपोर्ट आपल्यासमोर ठेवला होता. ७५ हजार कोटी गरिबांचे पैसे त्यांच्या खिशात कसा गेला हे सांगितलं. गरिबांचा जो पैसा जात आहे ते थांबवण्यासाठी इंडिया जिंकायला हवं. त्यासाठीच सर्वजण या मंचावर बसले आहेत.आम्ही ठराव मांडला आहे. त्यानुसार काम करु, प्रत्येक राज्यात जाणार, बैठक घेणार. बेरोजगार, महागाईचा मुद्दा मांडू. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातोय. शरद पवार यांच्यानंतर माझा नंबर लावतो. मी ५५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी असं कधी पाहिलं नाही. मी असा पंतप्रधान पाहिला नाही. विरोधकांना न बोलवता त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं.मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावलं नाही. चीन जमीन हडप करत आहे, कोरोना संकट होतं, नोटबंदीच्यावेळी लोक अडचणीत होते तेव्हा त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही. त्यांचा आजचा अजेंडा काय आहे ते मला माहिती नाही. ते हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेला जात आहे.