तीन आठवड्यांपूर्वी विवाह झाल्यानंतर तरुणाचा राहत्या घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे उघडकीस आली होती. यात पोलिसांनी शवविच्छेदनाच्या वेळी तरुणाचा व्हिसेरा राखून ठेवला होता. दरम्यान, आपला मुलगा आवडत नसल्याच्या कारणाने सुनेने त्याचा गळा दाबून खून केल्याची तक्रार मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात देताच गेवराई पोलिसांनी माहेरी असलेल्या सुनेला शनिवारी अटक करून चौकशी केल्यानंतर रविवारी सुनेला गेवराई न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
निपाणी जवळका तांडा येथील रहिवासी असलेला पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (२२) या तरुणाचा १४ ऑक्टोबर रोजी पौळाचीवाडी येथील शीतल सुरेश जाधव हिच्याशी विवाह झाला होता. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री साडेअकरा वाजता पांडुरंग याचा घरातील बेडरूममध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झालेला होता. तेव्हा पत्नी शीतल त्याच्याबरोबरच होती. तिने बेडरूमच्या बाहेर येऊन नातेवाइकांना पती बेशुद्ध पडले असून शरीर थंड झाले असल्याचे सांगितले होते. पांडुरंगला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घाेषित केले होते.
सुनेने गळा दाबून खून केल्याची तक्रार
दरम्यान, मुलगा पांडुरंग चव्हाण याची आई नीलाबाई राजाभाऊ चव्हाण (४५) यांनी शनिवारी रात्री गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार देत माझा मुलगा आवडत नसल्याच्या कारणाने सुनेने मुलाचा गळा दाबून खून केल्याची तक्रार दिली आहे. आईच्या तक्रारीवरून अखेर सुनेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीच्या मृत्यूनंतर पत्नी गेली माहेरी
पांडुरंग चव्हाण याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी शीतल नातेवाइकांसह गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर ती सासरी निपाणी जवळका येथे न जाता ती नातेवाइकांच्या सोबत माहेरी गेली होती. अंत्यसंस्काराला पांडुरंगची पत्नी व नातेवाईक आले नव्हते, असे सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.