• Tue. Apr 29th, 2025

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी यांनी बांधली झाडाला राखी; वृक्ष संवर्धनाचे केले आवाहन

Byjantaadmin

Aug 30, 2023
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी यांनी बांधली झाडाला राखी; वृक्ष संवर्धनाचे केले आवाहन
लातूर दि. 30 ( जिमाका ) रक्षाबंधन हा सण देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बहिणीच्या रक्षेसाठी भाऊ पाठीशी असावा म्हणून बहिणी भावाला राखी बांधते अशी या सणाची परंपरा आहे. आपण वृक्षारोपण करतो पण वृक्षाचे संवर्धन म्हणावं तेवढे करत नाही. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी वृक्षालाच राखी बांधून वृक्षाचे संवर्धन करण्याचा संदेश जिल्ह्यातील नागरिकांना दिला. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पिंपळाच्या झाडाला राखी बांधून वसुंधरा प्रतिष्ठानच्या उपक्रमात जिल्हाधिकारी यांनी सहभाग नोंदवत उत्साह वाढविला.
मानव आणि निसर्ग यांच्यातील नात दृढ होण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या.
राज्यात वनाच्छादित क्षेत्र अत्यल्प असलेल्या जिल्ह्यात लातूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो.अधिकाधिक वृक्षारोपण करून आणि विशेषतः त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यापर्यंत वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याची चळवळ निर्माण व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊन वृक्ष संवर्धनाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत जावे यासाठी प्रयत्न करत आहेत.   वसुंधरा प्रतिष्ठानच्या वृक्षाला राखी बांधण्याच्या कार्यक्रमाला यावेळी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, अमोलआप्पा स्वामी, डॉ. अजित चिखलीकर, उमेशआप्पा ब्याकोडे, किसन फुलमाळी, प्रिया मस्के, सुनैना नायब, श्रद्धा मोरे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed