वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटो सेशनदरम्यान नीरज आणि कांस्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा याकुब वेडलेच आपापल्या देशांचा ध्वज घेऊन उभे होते. नदीमकडे पाकिस्तानचा ध्वज नव्हता. नीरजने नदीमला त्याच्याकडे बोलावले. नदीम नीरज चोप्राजवळ येऊन उभा राहिला आणि दोघांनी तिरंग्यासोबत एकत्र फोटो काढले.
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज इतिहासातील पहिला भारतीय ठरला आहे. तर अर्शद हा या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. नीरजने अंतिम फेरीत 88.17 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले, तर अर्शदने 87.82 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले.
हांगझूमध्ये पुन्हा भेटू – नीरज
नीरज म्हणाला, ‘मी कार्यक्रमानंतर अर्शद नदीमला भेटलो आणि आम्हाला आनंद झाला की आमचे दोन्ही देश क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत आहेत. आमच्या युरोपियन प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवल्याचा आम्हाला आनंद आहे. खेळांमध्ये दोन्ही देशांदरम्यान नेहमीच टक्कर असेल. मला वाटते या विजयानंतर चाहत्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या अपेक्षा वाढतील. आपण हांगझूमध्ये पुन्हा भेटू.’


पात्रता फेरीत मोसमातील सर्वोत्तम भालाफेक
पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीरजने 88.77 मीटर लांब भाला फेकला. ती त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. यासोबतच त्याला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही मिळाले.या वर्षी मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने मोसमातील सर्वोत्तम 88.67 मीटरची कामगिरी केली होती. ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच 25 वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीग चॅम्पियनदेखील आहे.
गेल्या वर्षी रौप्य जिंकले
या चॅम्पियनशिपच्या गेल्या मोसमात नीरज चोप्राने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने 88.39 मीटर भालाफेक केली. त्याने पदकासाठी भारताची 19 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली होती.