मुझफ्फरनगरमधील एका शाळेत एका मुलाला विद्यार्थ्यांकडून मारहाण करवण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी फॅक्ट चेकर आणि अल्ट न्यूजचा सह-संस्थापक मोहम्मद झुबैरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पॉक्सोअंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच गावात पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील एका खासगी शाळेत शिक्षिकेच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गातील एका मुस्लिम मुलाला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही घटना मुझफ्फरनगरच्या मंसूरपूर पोलिस ठाणे हद्दीतील खुब्बापूर गावातील आहे. पोलिसांनी महिला शिक्षिकेविरोधातही एफआयआर नोंदवला आहे. मोहम्मद झुबैरने हा व्हिडिओ शेअर केला होता. तथापि, यात सदरील मुलाची ओळख जाहीर झाली होती. या प्रकरणी विष्णू दत्त नावाच्या तक्रारदाराच्या तक्रारीवरून झुबैरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार खुब्बापूरचाच रहिवासी आहे. यानंतर झुबैरने व्हिडिओ डीलीट केला होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला व्हिडिओ डीलीट करण्याची इच्छा आहे, म्हणून व्हिडिओ डीलीट करत आहे असे ट्विट झुबैरने केले होते.गेल्या वर्षी एका ट्विटवरील एफआयआरनंतर झुबैरला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. तथापि, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर 23 दिवसांच्या कैदेनंतर झुबैरला सोडण्यात आले होते.