शरद पवार यांच्या मागे आपण उभे राहिले पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आपल्याला महत्त्वाचा आहे. या विचारानेच आपण एवढी वर्षे गाठली आहेत. याच विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यानंतर आज आपली दिशाभूल होतेय का, असे सर्वांना वाटू लागले आहे. पुन्हा एकदा योग्य दिशेने येण्याची गरज आहे. पुरोगामी विचारांचे लोक एकत्र राहिले तर पुन्हा आपण राजकारणात बदल करु शकू असे मत कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शाहू महाराज यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान शाहू महाराज म्हणाले की, शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्रावर संकट कोसळले तेव्हा शरद पवार दिल्लीतून राज्यात आले होते. दंगली पेटल्या होत्या तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित केली होती. नंतर ते कृषिमंत्री होते. त्यांच्यामुळेच शेतकरी उंच मानेने जगू शकला. पण आज दिल्लीमध्ये शेतकऱ्याचे काय सुरु आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांना किती वेठीस धरले, हे देशाने बघितले आहे. त्यामुळे आपण योग्य मार्गाने चालले पाहिजे.
शाहू महाराज म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एक मंत्री मला भेटायला आले होते. त्यांना मी एकच प्रश्न विचारला, हे जे घडले आहे ते कसे आणि का घडले? सेशन संपल्यावर निवांतपणे मला हे सांगा. परंतु त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. हा जाब आपल्यालाच विचारावा लागेल, असे आवाहन शाहू महाराजांनी केले आहे.
हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
रोहित पवार म्हणाले की, मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी आणि त्याला ताकद देण्यासाठी आलो आहे. प्रतिगामी विचारांना त्याची जागा दाखवण्यासाठी आलो आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना भाजपाकडून तडा आणण्याचं काम केलं जात आहे. पण, त्या विचारांना उंचीवर नेण्याचे काम आम्ही करू.