• Sat. Aug 16th, 2025

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद

Byjantaadmin

Aug 26, 2023

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद

लातूर,  (जिमाका): कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवास शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद लाभला. लातूर शहरातील अंबेजोगाई रोड येथील मुक्ताई मंगल कार्यालयात झालेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या हस्ते झाले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथील आहार तज्ज्ञ प्रियंका शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर, मांजरा कृषि विज्ञान केंद्राच्या आहार तज्ज्ञ अंजली गुंजाळ, स्मार्टचे नोडल अधिकारी मोहन गोजमगुंडे, माविमचे जिल्हा व्यवस्थापक मन्सूर पटेल, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक मनिषा बांगर, प्रशासन अधिकारी अशोक गिरवले उपस्थित होते.रानभाज्या महोत्सवांमध्ये लातूर जिल्ह्यातील 58 स्टॉल धारकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रानभाज्या यामध्ये तोंडली, तांदूळजा, अंबाडी, करटूले, घोळ, टाळका, शेवगा, तांदूळ कुंद्रा, तरवटा, उंबर, काठेमात सेंद्रिय गुळ, सेंद्रिय तेल यासारख्या विविध प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवामध्ये होत्या.

याप्रसंगी वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथील आहार तज्ज्ञ प्रियंका शेंडगे यांनी प्रत्येक रानभाज्या आणि त्यात कोणते गुणधर्म आहेत, हे उदाहरणासह सांगितले. महिलांमध्ये लोहची कमतरता असते, त्यासाठी नेमका कोणता आहार घ्यावा, हे शास्त्रीय पद्धतीने सांगितले. पायाला गोळे येणे, अशक्तपणा येणे हे तुमच्यातील जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण असते, त्यामुळे आहार घेताना त्यातील सत्व माहिती करून घेणे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले. मांजरा कृषि विज्ञान केंद्राच्या आहार तज्ज्ञ अंजली गुंजाळ यांनीही कृषि विज्ञानातील रानभाज्याचे महत्व विशद केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, कृषि विकास अधिकारी सुभाष चोले,आत्माच्या प्रकल्प उपसंचालक मनिषा बांगर यांनी मनोगत व्यक्त केले.‘ओळख रानभाज्यांची’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *