नागपूर : सना खान हत्याकांडात दिवसागणिक नवनवी माहिती समोर येत आहे. नागपूरपासून सुरू झालेलं हे प्रकरण जबलपूरमार्गे नरसिंगपूरला पोहोचले आहे. तपासादरम्यान मध्य प्रदेशातील तेंदुखेडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांचे नाव समोर आले. त्यामुळे मानकापूर पोलिसांनी शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर ते गुरुवारी नागपुरात पोहोचले. चौकशीनंतर बाहेर आलेल्या शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना मी निर्दोष असल्याचा दावा करत या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले.संजय शर्मा म्हणाले, “पोलिसांना जबलपूरमध्ये झालेल्या हत्येची माहिती हवी होती. या प्रकरणातील आरोपी अमित साहू १० ते १५ वर्षांपूर्वी माझ्याकडे काम करायचा, तो ओळखीचा होता, त्यामुळे पोलिसांना त्याबाबतची माहिती हवी होती. हे मी पोलीसांना सांगितले. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.” ते पुढे म्हणाले की, “गेल्या चार-पाच वर्षांपासून ते अमित साहूला भेटलेले नाहीत. हत्येनंतर तो मला भेटला होता, पण त्यावेळी मला या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती.”
आरोपींची समोरासमोर चौकशी
नागपूरला पोहोचलेल्या आमदार शर्मा यांना डीसीपी झोन २ च्या कार्यालयात बसवून त्यांची पोलिसांनी चौकशी केली. सुमारे दोन तास आमदारांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी आमदार आणि दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली. मृत सनाची आईही पोलीस कार्यालयात हजर होती.
गरज पडल्यास पुन्हा चौकशी करू
या प्रकरणावर बोलताना डीसीपी राहुल मदने म्हणाले, “तपासादरम्यान आमदाराचे नाव समोर आले, त्यानंतर त्यांना चौकशीत सहभागी होण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यादृष्टीने ते आज येथे पोहोचले होते. आमदाराने चौकशीदरम्यान सहकार्य केले आहे. तूर्तास, त्यांना जाण्यास सांगितले आहे, परंतु भविष्यात गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल.”