मुंबई : चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. तर चंद्रावर मोहीम फत्ते करणारा भारत चौथा देश ठरला आहे. चंद्राच्या अभ्यास करण्यास यामुळे मोलाची मदत होणार आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. 40 दिवसांचा प्रवास करत चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं आहे. आता चंद्रावरील पुढच्या अभ्यास सुरु होणार आहे.चंद्रावर दिवस आणि रात्रीचा कालावधी 14 दिवसांचा आहे. म्हणजेच 14 दिवसानंतर रात्र येते. 23 ऑगस्टला सूर्योदय होणार असल्यानेच हा दिवस निवडला गेला होता. दक्षिण ध्रुवावर आता 14 दिवस सूर्यप्रकाश असणार आहे. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत दक्षिण ध्रुवावर प्रखर ऊन असणार आहे. त्यामुळे लँडरवरील सोलार पॅनेलला मदत होणार आहे. चंद्रयान रोव्हर चार्ज होईल आणि आपलं मिशन पूर्ण करण्यास मदत होईल.
आतापर्यंत चंद्रयान 3 चा प्रवास
- 14 जुलैला चंद्रयान 3, 170 किमी ते 36500 किमी परिघात सोडलं होतं. चंद्राच्या दिशेने जाताना अंडाकृती फिरत ते जवळ जात होतं.
- 15 जुलैला चंद्रयान 3 चं परिघ वाढवून 41762 किमी ते 173 किमी केलं गेलं.
- 17 जुलैला दुसऱ्यांदा परिघ वाढवण्यात आला आमि 41603 किमी ते 226 किमी करण्यात आला.
- 18 जुलैला तिसऱ्यांदा परिघ वाढवून 51400 किमी ते 228 किमी करण्यात आला.
- 20 जुलै रोजी चौथ्यांदा परिघ वाढवून 71351 किमी ते 233 किमी इतका करण्यात आला.
- 25 जुलैला पाचव्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि 1,27603 किमी ते 236 किमी करण्यात आला.
- 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात चंद्राकडे प्रस्थान केलं.
- 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
- 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं