लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ विमा द्या – आ. अभिमन्यू पवार
औसा – लातूर जिल्ह्य़ात जून महिना पुर्णपणे कोरडा राहिल्याने खरिप हंगामातील पेरणी जुलै महिन्यातील थोड्याफार पावसावरच शेतकऱ्यांनी उरकली यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी अल्पशा पावसाने हजेरी लावली. मात्र आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी मारल्याने पावसाअभावी शेतातील कोवळी पिके कोमेजून गेली तसेच पिकांची अपेक्षित वाढ खुंटली आहे. पुरेशा पावसाअभावी तसेच उशिरा पेरण्या झाल्यामुळे सोयाबीन, मुग उडीद व तूरीसह सर्वच खरीप पिकांच्या संभाव्य उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट येणार असल्याची चिंताजनक बाब निर्देशनास समोर येत असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३-२०२४ हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जोखीम अंतर्गत सोयाबीन सह इतर पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पिकविमा नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाव्दारे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यात जवळपास सर्व क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून लातूर जिल्ह्यातील ८ लाख ५१ हजार १८४ अर्जाद्वारे ५९ लाख ९१ हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे. जवळपास २० ते २५ दिवसापासून पाऊस नसल्याने शेतातील कोवळी पिके पावसाअभावी कोमेजून गेली आहेत. तसेच पिकांची अपेक्षित वाढ खुंटली आहे. पुरेशा पावसाअभावी तसेच उशिरा पेरण्या झाल्यामुळे सोयाबीन, मुग उडीद व तूरीसह सर्वच खरीप पिकांच्या संभाव्य उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट येणार असल्याची चिंताजनक बाब औसा व निलंगा तालुक्यातील गावांचा दौरा करताना निदर्शनास आली असल्याचे सांगून संदर्भिय शासन निर्णयामधील मुद्दा क्र. १०.३ अन्वये हंगामातील प्रतिकूल परिस्थिति नुकसान भरपाई निश्चित करणे या तरतुदी अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिति उदा पुर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात सरासरीच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई च्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादिपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. सोयाबीन सह सर्वे खरीप पिकांच्या उत्पादनात आजरोजीच ५० टक्के पेक्षा अधिकची घट दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सदरील परिस्थिती शेतकरी चिंतेत असून पाऊस अत्यल्प झाल्याने उत्पन्नाची आशाच मावळली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांचे खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३-२४ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतील जोखीम अंतर्गत सोयाबीन सह इतर पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याबाबत अधिसूचना निर्गमित करून संभाव्य नुकसान रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकन्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत विमा कंपनीस आदेश द्यावेत अशी मागणी या निवेदनाव्दारे आ. अभिमन्यू पवार यांनी लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्याकडे केली आहे.