हिप्परसोगा – कातपूर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करा
आ.अमित देशमुख यांना निवेदन आ.अभिमन्यू पवार यांचेही शिफारसपत्र
औसा/प्रतिनिधी:लातूर तालुका हद्दीतील तावरजा नदी ते कातपूर या ४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करून त्याचे काम लवकर सुरू करावे,या मागणीचे निवेदन माजीमंत्री आ.अमित देशमुख यांना देण्यात आले.विशेष म्हणजे यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही शिफारसपत्र दिले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना लातूर शहराशी जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे.परंतु हिप्परसोगा ते कातपूर मार्गावर लातूर तालुक्याच्या हद्दीत तावरजा नदीपासून कातपूर पर्यंत हा रस्ता खराब झाला आहे.त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्याचा समावेश करून त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे,अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दोन मतदारसंघांच्या सीमेलगत हा मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांनी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.प्रत्यक्षात रस्ता लातूर मतदारसंघात असल्यामुळे आ.पवार यांनी स्वतःचे शिफारस पत्र ग्रामस्थांना दिले.अमोल सोमवंशी यांच्या नेतृत्वात आ. अमित देशमुख यांना रस्ता मागणीचे निवेदन व आ.पवार यांचे शिफारस पत्र देण्यात आले.
यावेळी सचिन पाटील,स्वयंप्रभा पाटील,अमर पाटील,विवेक देशमुख,कातपूरचे माजी सरपंच सतिश मस्के यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.